नाशिक : देशासह राज्यभरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकची धुलिवंदनला एक अनोखी परंपरा आहे आणि ती म्हणजे वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक. तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरु असून हा दाजीबा नवसाला पावणारा देव असून तो सर्वांचे विघ्न दूर करतो असा समज आहे.


राज्यात आज धुळवडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात असून नाशिकमध्ये धुलिवंदनला एक अनोखी मिरवणूक काढण्यात येते. जी वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक म्हणून ओळखली जाते. जुने नाशिक परिसरातील दाजीबा वीर अर्थातच बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती असून विविध देवांची वेशभूषा ते परिधान करतात. डोक्याला भरजरी वस्त्रं, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेष धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबाची मिरवणूक निघते. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत केले जाते, दाजिबांवर फुलांचा वर्षावही केला जातो.


राज्यभरात होळीनंतर धुळवडीचा उत्साह; खासदार नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी कोरकू नृत्य


वीर दाजीबा बाशिंग या पारंपारिक मिरवणुकीमागे एक आख्यायिका सुद्धा आहे. हळद लागलेल्या नवरदेवाची लग्नाची ईच्छा अपूर्ण राहिली, त्यामुळे अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो. हे दाजीबा नवसाला पावणारे असून आज त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व ईच्छा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे. 300 वर्षांपासूनची ही परंपरा असून जुन्या नाशकातील बेलगावकर यांच्याकडे 40 वर्षांपासून हा मान देण्यात आला आहे.


पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा


जुन्या नाशिकमधून या मिरवणुकीला सुरुवात होऊन जूनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगाघाटावरून परत जुन्या नाशिक मध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो. दुपारी दोन वाजता निघालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत सुरु असते. या पारंपारिक मिरवणुकीमुळे नाशिकमधील वातावरण भक्तिमय होऊन जातं. धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकने गेल्या 300 वर्षांपासून ही परंपरा जपली आहे.