नाशिक : लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या शिंदे पळस गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली.

 
वाळूमाफिया असलेल्या आरोपीनं हत्येनंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, मात्र हा सगळा सुनियोजित कट असल्याचा आरोप होत आहे.

 
मृत ज्योती थेटे या तरुणीचे वाळू व्यवासायिक शांताराम टावरेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र ज्योती उच्चशिक्षित असल्याने तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यांनी शांतारामकडे आपलं मत मांडलं. मात्र या रागातून शांतारामने ज्योतीला घराबाहेर बोलवून कटरच्या सहाय्याने तिचा गळा चिरला.

 
यानंतर स्वतःच्या नसा कापून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यासोबत आलेल्या चार मित्रांनी ज्योतीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून फक्त शांतारामलाच रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला, तर ज्योती मात्र जिवाला मुकली. त्यामुळे हा सुनियोजित कट असून त्यात शांतारामच्या मित्रांचाही हात असल्याचा आरोप ज्योतीच्या कुटुंबीयांनी केला आहे.