नाशिक: नाशिकमध्ये आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. आम्ही जी कामं केली त्याचं प्रेझेन्टेशन राज ठाकरे काल इथं करु गेले.' अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते.

'काल राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेतली. पण या सभेत त्यांनी केवळ नकला करुन फक्त वेळ मारुन नेली.' अशी टीकाही महाजन यांनी केली.

दरम्यान, आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याआधी बोलताना गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. महाजन यांच्या या टीकेला आता राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काल राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केली होती. तसेच यावेळी भाजपवरही त्यांनी टीका केली.

मुख्यमंत्र्यांची नक्कल

नाशिकमध्ये काल शिवसेनेची सभा झाली, उद्या मुख्यमंत्र्याची होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नक्कल करुन दाखवली. मुख्यमंत्री येऊन केवळ आश्वासन देऊन जातील, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. शिवाय राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं ‘भाजपकुमार थापाडे’ असं नामकरणही केलं.

”काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपची वाटचाल”

काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजप-शिवसेनेलाही सत्तेचा आणि पैशाचा माज आला आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला. शिवसेना-भाजपने एकट्या नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 88 उमेदवार दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

अशा गुंडांच्या हातात सत्ता गेली तर नाशिकचं काय होईल, असा प्रश्न पोलिसांनी पडला आहे. पोलिसांनीच या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत माहिती दिली असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.