नाशिक : एकीकडे लाडक्या बाप्पाला आज सर्वत्र भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. तर दुसरीकडे नाशकात गणेश विर्सजनाला गालबोट लागल्याचं बघायला मिळालय. नाशिक जिल्ह्यात एकूण चार जण बुडाले असून यापैकी काही जणांचा मृतदेह सापडला आहे, तर काहींचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.


जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक धरणातून विसर्गाला सुरुवात झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच नाशिक शहरात दुपारी आपल्या मामासोबत गणपती विसर्जनासाठी वालदेवी नदीपात्रात गेलेल्या अजिंक्य गायधनीला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला असून संध्याकाळपर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत होते.


दुसरीकडे दारणा नदीत बुडून नरेश कोळी याचा मृत्यू झाला असून उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंतमधील काजवा नदीपात्रात एकाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या रवींद्र मोरे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुपारी 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून पट्टीचा पोहणारा अशी त्याची ओळख होती. मोरे यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह परिवारावर शोककळा पसरलीय.


देवळा तालुक्यातील वाखारी गावात विसर्जनासाठी गेलेल्या एका लष्करी जवानाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रशांत गुंजाळ हा जवान दोन महिन्याच्या सुट्टीवर आपल्या गावी नुकताच आलेला होता,आज दुपारच्या सुमारास आपल्या घराजवळील शेतात तो गणेश विसर्जनासाठी गेला असता विसर्जन करते वेळी तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला असून ही घटना समजताच गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. विहिरीत पाणी जास्त असल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत शोधकार्यात अडचणी येत होत्या.