नाशिक : गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागल्यानं सर्वत्र आनंदाच वातावरण आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनाला काही तासच शिल्लक राहिले असताना नाशिककरांवरचं करोनाचे संकट काही अंशी कमी झालं आहे. कोरोनाच्या या संकटात नाशिककरांनाही दिलासा मिळाला आहे. नशिक शहरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट तब्बल 84 टक्के झाला आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरापाठोपाठ नाशिक शहराचा कोरोना रिकव्हरी रेट दुसऱ्या चांगला आहे. ठाणे शहर 89 टक्के तर नाशिकचा रिकव्हरी रेट 84 टक्के आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी नाशिककरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
मालेगावनंतर नाशिक शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलं होते. मे, जून महिन्यात तर मालेगावला मागे टाकत नाशिकमध्ये शेकडोच्या संख्येने कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने शहरात सर्वेक्षण सुरू केले. बाधित रुग्ण अती जोखमीचे आणि बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्यात आले. झोपडपट्टी, दाट लोकवस्ती. या भागात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. औषध फवारणी सॅनिटायझेशन करण्यात आले. अॅंटीजन आणि रॅपिड टेस्ट सुरू केल्यात. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात रॅपिड टेस्ट केल्यानं दिवसाला हजारोंच्या संख्येन टेस्ट होऊ लागल्यानं रुग्णसंख्या मध्यंतरीच्या काळात झपात्यानं वाढली होती.
मात्र आता तेवढ्याच वेगाने रुग्ण बरेही होत आहेत. शहरातील रुग्णवाढीची संख्या बघून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिकला भेट देऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर यंत्रणा अधिक झपाट्याने कामाला लागली. नाशिक शहरातील कोरोना मुक्तीचा दर जून महिन्यात 41 टक्के होता. जुलै महिन्याच्या अखेरीस तो 71 टक्क्यांवर गेला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 71 हून कोरोना मुक्तीचा दर 74/75 टक्क्यांवर गेला. आता रिकव्हरी रेट थेट 84 टक्के झालाय.
पुढच्या टप्प्यात नाशिक शहरात अॅंटीबॉडीज टेस्ट केली जाणार आहे. शहरातील रोज एक भाग निवडला जाणार आहे. त्या भागात एक दोन घरे सोडून अॅंटीबॉडीज टेस्ट केली जाणार आहे. लहानांपासून वृद्ध व्यक्ती आणि तरुण-तरुणी अशा सर्वांचीच चाचणी केली जाणार आहे. ज्या वयाच्या पुरुषाची टेस्ट केली त्याच वयाच्या महिलेची देखील टेस्ट केली जाणार आहे. त्यानुसार महिला, पुरुष आणि विविध वयोगटानुसार आढावा घेणं सोपं होणार आहे.
नाशिक शहरात अजमितीस 18 हजार 590 एकूण कोरोनाबाधित रुग्ण असून 16 हजार 355 कोरोनामुक्त झालेत. तर 1816 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 419 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 27 हजार 677 इतकी आहे. त्यापैकी 22 हजार 925 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 745 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 4007 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याची रुग्ण बरे होण्याची सरासरी 82.83 टक्के एवढी आहे. यात येत्या काळात अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे.