नाशिक शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदेंवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2017 09:00 PM (IST)
नाशिक : नाशिक शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह तिघांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदे यांच्याविरोधात उमा जाखडी या महिलेनं तक्रार केली होती. उमा जाखडी यांचे पती अजय यांनी सुहास कांदेंकडून 30 लाख रुपये व्याजानं घेतले होते. मूळ रक्कम परत देण्याबरोबरच जाखडी यांनी व्याजाचे 1 लाख रुपयेही परत केले. मात्र तरीही कांदे यांचे कार्यकर्ते विलास हिरे आणि फरहान यांनी जाखडी यांच्याकडे व्याजाचा तगादा लावला. अजय जाखडी यांना शुक्रवारी महात्मा नगर मैदानाजवळ चर्चेसाठी बोलावून त्यांचं अपहरण केल्याचा आरोप उमा जाखडी यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर कांदे आणि इतर सहकारी फरार झाले आहेत.