नाशिक : कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकरी कुटुंबातील मायलेकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यातल्या पांढुर्ली गावातील शेतकरी कुटुंबाने बँकेच्या अन्यायकारक वसुली मोहिमेविरोधात हे पाऊल उचललं. त्यामुळे ही अन्यायकारक वसुली मोहिम थांबवण्याची मागणी होत आहे.


कैलास मुकुंद वाजे आणि त्यांची आई सुलोचना मुकुंद वाजे असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मायलेकांचं नाव आहे. त्यांच्यावर सध्या देवळाली कॅम्प परिसरातील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 2006 मध्ये त्यांनी सहा लाख रुपये कर्ज घेतलं, त्यानंतर कायमच नापिकी, अस्मानी, सुलतानी संकटामुळे हातात पैसे येत नव्हते. आईच्या नावावरही विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज घेतलं. कर्जाचा हा बोजा 13 लाखांपर्यंत जाऊन पोहोचला.

याच कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पथक रविवारी दुपारी वाजे कुटुंबीयांच्या घरी धडकलं. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर टोकाचं पाऊल उचलत वसुली पथकाच्या समोरच मायलेकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुद्दल भरण्यासाठी मुदत मागत होतो, तरीही अवमानकारक शेरेबाजी करून तगादा लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दुसरीकडे बँकेने शेतकरी कुटुंबाचे आरोप फेटाळले आहेत. ''बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांचा छळ करण्यासाठी जात नाहीत, तर वसुलीसाठी जातात, बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुली मोहिम सर्वत्र सुरु आहे. 12 वर्षांपासून वाजे कुटुंबीयांकडे कर्ज थकीत आहे. त्याची विचारणा करण्यासाठी गेलो असता वाजे कुटुंबीयांनी वसुली पथकाची गाडी फोडली,'' असा दावा बँकेने केला.

जिल्हा बँकेच्या 2 लाख 42 हजार थकबाकिदारांकडून एकूण 2 हजार 762 कोटी रुपयांची कर्जवसुली करायची आहे.  त्यापैकी आतापर्यंत केवळ साडेसहाशे कोटी रुपयाची वसुली झाली. तर कर्जमाफी योजनेअंतर्गत सरकारकडून बँकेला 485 कोटी प्राप्त झाले आहेत. उर्वरित वसुली झाली नाही तर बँक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने वसुली मोहिम राबवण्यावर बँक प्रशासन ठाम आहे.