नाशिक: नाशिक शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नाशिक महापालिकने मुंबईच्या धर्तीवर डास प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्ष पदी स्वत: आयुक्त असणार आहेत.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यात नाशिकमध्ये तब्बल 1632 संशयित रुग्ण आढळले, त्यापैकी 640 जण हे बाधित होते. तर ऑक्टोबर महिन्याच्या 19 तारखेपर्यंत डेंग्यूच्या 275 संशयित रुग्णांपैकी 68 जण हे बाधित असल्याच निदर्शनास आले.
त्यामुळे शहरातील डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकडून केल्या जाणाऱ्या उपाय-योजनांबाबत नागरिकांकडूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. डेंग्यूला रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आत्तापर्यंत 42 प्रभागांमध्ये डेंग्यूबाबत मोहीम राबवण्यात आली असून अनेकांना नोटिसा बाजावण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, आता महापालिकतर्फे मुंबईच्या धर्तीवर डास प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीमध्ये वैद्यकीय, शिक्षण यासह इतर विभागांच्या प्रमुखांचा समावेश राहणार असून अध्यक्षपदी स्वतः आयुक्त असणार आहे.