नाशिक : मनमाडमधील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाणीप्रश्नावरून भाजपच्या दिंडोरीच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी मनमाड नगरपालिकचे मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तसेच काम नीट करण्याचा इशारा देखील भारती पवारांनी दिला.


मनमाडच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवारही उपस्थित होत्या. आपल्या पहिल्याच बैठकीत खासदार महोदयांनी अधिकाऱ्यांना घाम फोडला. पेशंटला आयसीयूमध्ये नेण्याची वेळ येते तशी वेळ आता मनमाडकरांवर आली आहे. त्यामुळे कामे नीट करा आणि ही माझी विनंती नाहीतर इशारा समजा. अशा शब्दात भारती पवार यांनी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांना दम भरला.


मनमाडला तब्बल 23 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकीला मनमाडचे लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि मनमाड नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


मनमाडचे पाणी संपेपर्यंत नगरपालिका गप्प का राहिली? मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती का कळवली नाही? असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


दहा दिवस स्थानिक पातळीवर नियोजन करुन मनमाडकरांना पाणी मिळणार असून त्यानंतर 2 जूनपर्यंत पाणी आवर्तन मिळणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मनमाडकरांवर ही वेळ प्रशासनामुळेच आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.