नाशिक : नाशिकच्या 9 गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. तळेगावमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती.


नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यात उमटले तळेगावाती घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर 9 गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती.

तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुरुवातीला 48 तास सांगण्यात आलेला संचारबंदीचा कालावधी वाढवण्यात आला होता. नऊ गावांपैकी विल्होळी गावातील संचारबंदी शुक्रवारी आणि शेवगेडांग गावातील संचारबंदी शनिवारी उठवण्यात आली. त्यानंतर उर्वरित 7 गावांची संचारबंदी आज सकाळी 6 वाजल्यापासून उठवली.

नाशिककरांनो, साचलेले मेसेज येतील, विश्वास ठेवू नका!


तणावाच्या पार्श्वभूमीवर खंडीत करण्यात आलेली इंटरनेटसेवा शनिवारी सुरु करण्यात आली.  सहा दिवसांपासून इंटरनेट बंद असल्यामुळे या काळात साचलेले मेसेज धडाधड मोबाईलवर येतील. मात्र जुन्या वादग्रस्त मेसेजवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

अफवांचे जुने परंतु इंटरनेट सेवा सुरु झाल्याने आता पोहोचलेले असे मेसेजेस, पोस्ट, फोटो डीलीट करावे. ते सर्व चुकीचे आहेत, घटनांची नीट माहिती घ्या. पोलीस यंत्रणेचे सायबर सेल कार्यरत आहेत.

बारीक लक्ष असल्याने नाशिकला सायबर सेलचे गुन्हे दाखल झाले आहेत. 8 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनवर IT ACT अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.