अकोला :  अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेलं गाव म्हणजे पातुर. मात्र हे गाव त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिरामुळं.


जागृत देवस्थान अशी पातूरच्या रेणुकेची ओळख आहे. अतिशय लोभस आणि मनमोहक रूप असलेल्या रेणुकेचं हे ठिकाण डोंगरावर आहे. विश्वस्त मंडळाच्या कल्पकतेतून सध्या या मंदिर आणि परिसराचा झपाट्याने विकास सुरु आहे. नवरात्रीसह वर्षभर येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.

ऐतिहासिक महत्त्व असलेलं पातूर : 

अकोला जिल्ह्यातील पातुर हे तालुक्याचे गाव आहे. याच पातुरला 'नानासाहेबांचे पातुर' या नावानेही ओळखले जातेय. नानासाहेब म्हणजे 'नानासाहेब पेशवे'.  या गावाचे मोठे ऐतिहासिक महत्व आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोरच्या डोंगरात लेण्या आणि भुयार आहेत. काही वर्षांपूर्वी गावात एका किल्लाही होता. या साऱ्या गोष्टी पातुरचे इतिहासासोबाताचे नाते आणि वैभवशाली संबंध सांगत आहेत.

आदिशक्तीची अनेक पीठं महाराष्ट्रात आहेत. अकोला जिल्ह्यातील देवींच्या अनेक शक्तीपीठांनी येथील अध्यात्मिक विश्व समृद्ध केलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर गावाची अध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या मंदिराने. गावाच्या बाहेर बाळापुर मार्गावर हे मंदिर आहे.

पातूरची रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरुप :

येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप मानलं जातं. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांसाठी पातुर म्हणजे जणू 'प्रती माहूर'च आहे. याठिकाणी नवरात्रासोबतच वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. विशेष म्हणजे देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या चिंचोली रुद्रयानी येथील रुद्रयनी देवीचं मंदिर आणि डोंगर येथून दृष्टीक्षेपात पडतं.

या ठिकाणी आज दिसत असलेले मंदिर पहिल्यांदा पन्नास वर्षांपूर्वी दिसले. या ठिकाणी आज असलेली मूर्ती आधीच विराजमान होती. मात्र माळरान आणि जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणी कुणीही येत नव्हतं. त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती. या ठिकाणी आज असलेली मूर्ती एका हिवराच्या झाडाखाली विराजमान होती. त्यानंतर तात्यासाहेब अत्तरकर यांच्या कल्पकतेतून या मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ झाला.

याठिकाणी श्रीकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण आणि दत्तात्रयाच्या तीन मंदिरांचं बांधकामही पूर्ण झालं आहे. गेल्या काही वर्षांत भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मंदिराला आधी पायऱ्या नव्हत्या. त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. आता या मंदिराला 256 पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत.

मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था, भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराजवळून बोर्डी नदी वाहते. निसर्गरम्य परिसर असलेल्या या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. तर नवरात्रातील नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.

पाहा व्हिडीओ :