नाशिक : "अनेक देशातील पुन्हा लॉकडाऊन होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे," असं वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोविड आढावा आणि व्यवस्थापन बैठक पार पडली. यावेळी प्रस्तावित साहित्य संमेलन निधी संकलनावरही चर्चा झाली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, संमेलन नियोजन समिती पदाधिकारी उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले की, "कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसातील वाढ चिंताजनक आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांमध्ये बेफिकीरी आली आहे. अत्यंत कमी जण मास्क वापरत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो.
कोरोना अद्याप संपलेला नाही. मास्क वापर बंधनकारक आहे हे प्रत्येक व्यावसायिक आणि नागरिकाने गांभीर्यानं घ्यायला हवं, असंही भुजबळ म्हणाले.
खाजगी टेस्टिंग लॅबमधील रिपोर्ट संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सरकारी लॅब आणि खाजगी लॅबमधील रिपोर्टमध्ये तफावत आहे. याची आम्ही तपासणी करणार असल्याचं भुजबळ यांनी नमूद केलं.
देशभरात 16 जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. राज्यात 36 हजार लोकांचं लसीकरणे होणं अपेक्षित होतं त्यातील 29 हजार लोकांचं लसीकरण झालं आहे. तसंच राज्यात 81 टक्के लसीकरण झालं आहे. 10 मार्चनंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊ शकते. तसंच लस घेतल्याने कोणताही साईड इफेक्ट्स होत नसल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
साहित्य संमेलनासाठी साडेतीन कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित
साहित्य संमेलनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. 12 आमदारांनी पत्र दिली आहेत. खाजगी हॉटेल्स काही रुम देणार आहे. विद्यापीठ आणि शहरातील लॉन्स मदत करत आहेत. बँक फेडरेशन मोठा निधी देणार आहे. संमेलनासाठी साडेतीन कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.