नाशिक : नाशिकमधील एका कथित घोटाळ्याबाबत काँग्रेसच्या नगरसेविकेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याने महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सफाई कामगारांच्या ठेक्याचा विषय नाशिकमध्ये चांगलाच चर्चेत असतांना आणि हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच काँग्रेसच्या नगरसेविका तथा प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करत तक्रार केलीय.

या तक्रारीत हेमलता पाटील यांनी म्हटलं की "तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता. मात्र नाशिकमध्ये याच सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांचा यात हात आहे. महापालिकेत ठेकेदारामार्फत 700 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना 27 हजार प्रतिमाह देणे अपेक्षित असतानाच त्यांच्या बँक खात्यातून ठेकेदार 16 हजार रुपये कपात करून कर्मचाऱ्यांना 11 हजार 500 रुपये एवढेच वेतन देत असून अशाप्रकारे दरमहा एक कोटी 85 लाख रुपयांचा गैरव्यवहार होतो आहे. तुम्हाला भ्रष्टाराचाची खूप चिड आहे, मात्र येथे सरळ सरळ अशाप्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातय."

हेमलता पाटील यांनी यापूर्वी स्मार्ट सिटीतील अनागोंदी कारभाराविषयी मुख्यमंत्रयांकडे तक्रार केली होती. मात्र आता त्यांनी थेट मोदींकडे स्मार्ट सिटी आणि सफाई कर्मचारी ठेक्यातील गैरव्यवहाराविषयी धाव घेतल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरला असून भाजपची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. पाटील यांच्याकडून केल्या गेलेल्या आरोपांबाबत महापौरांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केलीय. एकंदरीतच हेमलता पाटील यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची पंतप्रधान कार्यालयाकडून आता कशाप्रकारे दखल घेतली जातीय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.