नाशिक: नाशिकमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. ‘आदित्य, उद्धव ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँक नाही. तर राज ठाकरे यांची कृष्णकुंज बँक अशी आहे की, जिची कुठेही शाखाच उरलेली नाही. त्यामुळे मतांची गुंतवणूक भाजपच्या बँकेत करा.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

'निवडणुकांनंतर राज ठाकरेंना फक्त नकला करण्याचं काम'

काल नाशिकमधील सभेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनीही आज नाशिकमधील सभेत उत्तर दिलं. ‘निवडणुकीनंतर यांना फक्त नकला करण्याचंच काम उरणार आहे. त्यामुळ गणपतीत यांना नकला करायला बोलवा.’ असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला.

‘राज ठाकरेंनी 5 वर्षात फक्त नकलाच केल्या. गेल्यावेळी भुजबळांची नक्कल यशस्वी झाली त्यामुळे आता माझी केली. पण नाशिककर आता फसणार नाही.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

‘आम्ही दिलेल्या पैशातूनच नाशिकमधली विकासकामं’

‘कुंभमेळा निधीसाठी राज ठाकरे यांनीच फोन केला, मनसेचे महापौर पत्र घेऊन आले होते हे ते विसरले का?, आम्ही दिलेले पैसे देखील हे पूर्ण खर्च करू शकले नाही. आम्ही दिलेल्या पैशातूनच नाशिकमधली विकासकाम झाली. राज ठाकरे काम नाही फक्त डायलॉगबाजी करतात.’ अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

‘राज ठाकरेंना चांगल्या कल्पना सुचतात, पण...’

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे फक्त बोटॅनिकॅल गार्डन, बोटॅनिकॅल गार्डन असंच ओरडत आहेत. पण गार्डन कायतुम्ही पैदा केलं का?. आधीपासूनच ते तिथं होतं. त्याला पैसा देखील टाटानीच दिला. मग तुम्ही काय केलं? राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते फार कल्पकही आहेत. त्यामुळे त्यांना कल्पना सुचतातही. पण त्या कल्पना ते कधीही चांगल्या ठिकाणी वापरत नाही. त्यामुळेच त्यांची आज ही अवस्था झाली आहे. असं म्हणत मुख्यमंत्री राज ठाकरेंवर बरसले

‘उद्धव ठाकरेंची लेना बँक, देना बँक नाही’

‘उद्धव ठाकरे ग्रामीण भागात प्रचाराला गेले नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची भाषा करतात. निवडणुकीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहील. ‘आदित्य, उद्धव ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँक नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

'आजपासून मी नाशिक दत्तक घेत आहे'

'रामदेव बाबांना सांगून नाशिकमध्ये लवकरच फूड पार्क सुरु करु. तसेच विमानसेवाही लवकरच सुरु करण्यात येईल. आजपासून मी नाशिक दत्तक घेत आहे.' अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

संबंधित बातम्या:

आम्ही केलेल्या विकासकामांचं प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं: गिरीश महाजन

मुख्यमंत्र्यांच्या रद्द सभेवरुन शिवसेनेचे तिरकस बाण

शरद पवार बेभरवशी : शिवसेना

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!

मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

माझ्या पक्षाचं मी बघून घेईन : राज ठाकरे

कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार