नाशिक : भारतातील उद्योगक्षेत्रात मोठं नाव असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीची तब्बल 10 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. स्पेअर पार्ट्सची चोरी करत, तसेच कंपनीच्या नावे बनावट स्पेअर पार्ट्स तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचाच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उद्योगक्षेत्रात यामुळे खळबळ उडाली.
वाहनांचे स्पेअर पार्ट्स बनवण्यात अग्रेसर असलेल्या नाशिकच्या बॉश कंपनीतून कच्चा माल परस्पर बाहेर नेऊन या मालापासून बनावट स्पेअर पार्ट तयार केले जात होते. बॉश कंपनीच्या नावे विकणाऱ्या एका टोळीच्या अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शिश अहमद हुसैन खान आणि अहमद रजा शुभराजी खान यांना अटक केली आहे.
बॉश कंपनीच्या जवळच असलेल्या पंडित कॉलनी परिसरात एका तीन मजली इमारतीमध्ये हे बनावट स्पेअर पार्ट तयार केले जात होते. ट्रकमधून हा माल बाजारात जात असताना पोलिसांनी छापा मारुन डिझेलच्या गाड्यांसाठी लागणारे नोझल, नीडल्स, व्हॉल्व सेट, पिस्टन असा एकूण 23 टन माल आणि 2 वाहनं जप्त केली आहेत.
विशेष म्हणजे कंपनीतीलच एक कॉन्ट्रक्टर यातील सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहे.
गेल्या पाच वर्षात बॉश कंपनीमध्ये चोरीच्या पाच घटना समोर आल्या असून, आजपर्यंत याबाबत 4 गुन्हे दाखल झाले आहेत आणि आता ही घटना समोर आल्याने कंपनी प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहेत. आता बॉश कंपनीने आपली अंतर्गत सुरक्षा वाढवली आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून अशाप्रकारे कामं करणार एक मोठ रकेटच शहरात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा माल नेमका कोण विकत घेतो आणि कुठे विकला जातोय याचा पोलिस शोध घेत आहेत.
हा सर्व मुद्देमाल पकडून 5 दिवसांनंतर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल का केला असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकंदरीतच या प्रकारामुळे उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.