नाशिकमध्ये भरधाव वाहनाने 7 मुलांना उडवलं, एकाच जागीच मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 14 Oct 2018 10:07 AM (IST)
वडाळागावात राहणारी सात लहान मुलं आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना धडक दिली.
नाशिक : नाशिकमध्ये नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, बाकी जखमी झाली आहेत. त्यातील दोघेजण गंभीर आहेत. वडाळागावात राहणारी सात लहान मुलं आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनाला घरातून निघाली होती. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ येताच एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर मार लागल्याने विशाल पवार या 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आणि इतर मुलं जखमी झाली. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून मुलांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना समजताच पवार परिवारावर शोककळा पसरली. जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. दरम्यान, मुलांना धडक देणाऱ्या वाहनचालकाचा सध्या पोलिस शोध घेत आहेत.