नाशिक : पूर्वीचं सरकार हिंदूंमध्ये फूट पाडून अल्पसंख्याकांचं संघटन करायची. मात्र, भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्प संख्यांकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी स्वामींनी काँग्रेस आणि नेहरु यांच्यावरही जहरी टीका केली. नेहरु-गांधी घराण्यातील कुणाकडेही खरी डिग्री नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पण, अल्पसंख्याकांमधील फुटीवरुन त्यांनी केलेल्या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त होतं आहे.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन सब्रह्मण्यम स्वामी म्हणाले की, "मोदी सरकारने तिहेरी तलाक रद्द करण्याचा प्रयत्न केल्याने, उत्तर प्रदेशात मुस्लीम महिलांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. मुस्लीम बहुल मतदार संघातील 125 पैकी 85 जागा भाजपला मिळाल्या. आम्ही हिंदूंना संघटीत करुन, अल्पसंख्यांकांमध्ये विभाजन करतो. पूर्वीचे सरकार हिंदूत फूट पाडायचे आणि अल्पसंख्याकांना संघटीत केलं जात होतं."

काँग्रेस आणि नेहरुवर जहरी टीका करताना स्वामी म्हणाले की, "नेहरु घराण्यातल्या एकानेही आजपर्यंत पास होऊन डिग्री घेतलेली नाही. सोनिया गांधींनी केम्ब्रिजमधून डिग्री घेतल्याची खोटी माहिती दिली होती. पण नंतर प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं. राहुल गांधींनीही कुठली डिग्री घेतलेली नाही. आंबेडकरांनी अभ्यासपूर्ण पीएचडी डिग्री घेतल्याने त्यांची नेहरुंना असूया होती." असंही स्वामी म्हणाले.

याशिवाय स्वामींनी राम मंदिर आणि काश्मीर प्रश्नावरुन रोखठोक मतं मांडली. काहीही झालं तरी राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच काश्मीर प्रश्न चर्चेतून सुटणार नाही. तर त्यासाठी पुरुषार्थ दाखवण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.