नाशिक : सत्ताधारी भाजपच्या डॉक्टर नगरसेविकेच्या पतीने नाशिक मनपाच्याच हॉस्पिटलमध्ये धुडघूस घालून तोडफोड करत दहशत माजवली. या घटनेचा सर्व स्तरतून निषेध होत असून फरार राजेंद्र ताजणेवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
साऊथ इंडियन सिनेमालाही लाजवेल अशी ताजणे यांनी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली. भाजपाच्या नगरसेवक डॉक्टर सीमा ताजणे यांचे पतिराज राजेंद्र उर्फ कण्णू ( kannu ) ताजणे यांनी हा प्रकार केला आहे. शनिवारी सायंकाळी इनोव्हा कार थेट मनपाच्या बिटको रुग्णालयात घुसवली. काचेचा दरवाजा तोडून गाडी आत शिरताच प्रचंड मोठा आवाज झाला. कर्मचारी रुग्णाचे नातेवाईक सैरभैर झाले. उपचार घेणारे रुग्ण काय घडले बघण्यासाठी बाहेर आले. ताजणे एवढ्यावरच थांबले नाही, तर आपल्या सोबत आणलेला पेव्हर ब्लॉकचा तुकडा त्यांनी एका नर्सच्या दिशेने भिरकवला. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. शिवीगाळ करत धुमाकूळ घालणाऱ्या राजेंद्र ताजणे यांना एका रुग्णाच्या नातेवाईकालाही मारहाण केली. यानंतर आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी, महापौर सतीश कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेत तर प्रशासनाने नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी मनपा आयुक्तांनी केलीय.
मारहाण करणे, सरकारी मालमततेच नुकसान करणे साथरोग प्रतिबंधक कायदा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजणेवर या आधीही मारहाण करणे तोडफोड करण्याचे गुन्हे दाखल असून तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे.
नगरसेविका सीमा ताजणे या डॉक्टर आहेत. त्यांच्याच पतीने रुग्णालयात तोडफोड केल्याने संताप व्यक्त होतो आहे. हे प्रकार थांबतील कधी असा सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र ताजणे यांचा रुग्णालय व्यवस्थपनावर रोष होता. त्यांच्या वडिलांचे याच रुग्णालायत काही दिवसपूर्वी निधन झाले. ती सल त्यांच्या मनात होती आणि त्यातूनच कालची घटना घडल्याची चर्चा आहे. भाजपची महापालिकेत सत्ता आहे, परंतु त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीने रुग्णालय व्यवस्थपनाविरोधात रोष व्यक्त केल्याने या घटनेच्या मुळाशी जाण्याची आणि भाजपने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला विरोधक देत आहेत. तर भाजपने घटनेचा निषेध व्यक्त करण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.
पंधरा दिवसपूर्वी भाजपच्याच नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी अशाच प्रकारे धुडघूस घालत खाजगी रुग्णालय फोडले होते. इतरही तीन ते चार खाजगी रुग्णालयात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा भावना व्यक्त करण्याचे हे हिंसक प्रकार कधी थांबणार असा सवाल उपस्थित होत आहे.