नाशिक : नाशकात एका बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत कारचालकाचा जीव वाचवला आहे. कार चालवताना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर पादचाऱ्यांच्या सहाय्याने या इसमाचे प्राण वाचवण्यात आले.

 
मंगळवारी दुपारी शरणपूर रोडकडे जात असताना दत्तू चौधरी नावाच्या व्यक्तीला कार चालवताना अचानक हृदयविकाराचा धक्का आला. कारचालकानं पालिकेजवळच्या श्यामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेजवळ गाडी थांबवली.

 
दत्तू चौधरींना असह्य वेदना होत असल्यानं कारमध्ये शेजारीच बसलेल्या व्यक्तीनं चौधरी यांच्या छातीला दाबण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार शेजारीच असलेल्या बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं पाहिला. त्यानंतर तात्काळ कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

 
कारचालकाला कारमधून बाहेर काढत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि चौधरी यांचा जीव वाचला. बँकेच्या कर्मचाऱ्यांची ही समयसूचकता सीसीटीव्हीत कैद झाली आहे.