Balasaheb Wagh Passed Away : नाशिकच्या के.के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ ऊर्फ भाऊ यांचं निधन झालं. रविवार, 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. व्रतस्थ गांधीवादी राहणी आणि विचारसरणी, आधुनिकतेकडे असलेला कल, शांत, संयमी, कार्यकुशल आणि त्यागी व्यक्तिमत्तवानं आकारास आणलेलं कृषी, शिक्षण, जलसंधारण, कारखानदारी, संघटन, सहकार या विविध क्षेत्रांमधील कार्य मौलिक आणि दखलपात्र स्वरूपाचे आहे.


नाशिकच्या के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ ऊर्फ भाऊ यांचे रविवार, 6 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांचा अंत्यविधी आज के. के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. तसेच अंत्यदर्शन दुपारी 12 ते 3 या वेळेत घेता येणार आहे. भाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 


बाळासाहेब वाघ यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी या छोट्याशा गावी झाला होता. त्यांना लहानपणापासून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर रावसाहेब थोरात,  कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील, कुसुमाग्रज व आजोबा सयाजीबाबा वाघ अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभला.


बाळासाहेब वाघ यांनी वडील देवराम तथा पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या नंतर सामाजिक, सांस्कृतिक, सहकार आणि शैक्षणिक वारसा समर्थपणे पुढे चालविला. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं सन 1970 साली के. के. वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. सन 2006 पर्यंत संस्थेचे 'उपाध्यक्ष' तर 2006 पासून आजपर्यंत 'अध्यक्ष' म्हणून तब्बल 51 वर्ष खंबीरपणे संस्थेची धुरा सांभाळली. त्यांच्या जाण्यानं ही पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे. के. के. वाघ संस्थेच्या रोपट्याचं त्यांनी महाकाय वटवृक्षात रुपांतर केलं. संस्था उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.


महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित कृषी आणि कृषिसंलग्न महाविद्यालय संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित तंत्रनिकेतन संघटना या तिन्ही राज्यस्तरीय संघटनांच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तर स्थापनेपासून ते आजपर्यंत या तिन्ही संघटनेचे एकोणावीस वर्षे 'अध्यक्ष' म्हणून कार्यरत होते. बाळासाहेब यांनी संघटनेचे वेळोवेळी विविध विभागांमार्फत शासनदरबारी प्रश्न मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्न तडीस नेले.


काकासाहेबनगर येथील निफाड तालुका ग्राहक मंडळ,  ग्राहक सहकारी संस्था, फळ व भाजीपाला संघ, मेडिकल ट्रस्ट अशा अनेक कृषि आणि सामाजिक संस्थेच्या स्थापनेत त्यांचे मोलाचं योगदान होतं. त्यांच्या पुढाकाराने निफाड तहसील कार्यक्षेत्रात 250 कर्मवीर बंधारे बांधून ते पूर्ण करण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं गठीत केलेला दुसरा महाराष्ट्र जलसिंचन आयोगातही त्यांनी 'सदस्य' म्हणून कामकाज केलं आहे.