नाशिक : रातोरात लखपती होण्यासाठी नाशिकमधल्या दोन युवकांनी एटीएम लुटण्याची योजना आखली. धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षाप्रणाली चोख असलेले हे एटीएम कसे तोडायचे, याचं प्रशिक्षण त्यांनी यूट्यूबवरुन घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.


किरण मोरे आणि अमित गवई असं या उच्चशिक्षित तरुणांचं नाव आहे. पदवीधर असलेले हे दोघं युवक एका खाजगी ठिकाणी कामही करतात. मात्र रातोरात लखपती व्हायचं होतं. या दोघांनी एटीएम लुटण्याचा प्लॅन आखला. मात्र त्यासाठी काय करायचं याची माहिती नव्हती. मग त्यांनी एटीएम लुटण्याच्या पद्धतीचे यूट्यूब व्हिडिओ पाहिले.

यु ट्युबवर व्हिडीओ पाहिल्यानंतर दोघांनी बाजारातून छन्नी, कटावणी, हातोडा असं साहित्य खरेदी केलं. पल्सर गाडीची नंबर प्लेट झाकून 30 नोव्हेंबरला मध्यरात्री कुलकर्णी गार्डन लगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर मध्यरात्री दोघे पोहोचले.

छ्न्नी हातोडीने एटीएम फोडण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र काही स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी पोलीसांना माहिती दिली. गस्तीवरच्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने या चोरांची पळापळ झाली. एटीएममधले पैसे घेऊन मजा करायची दूरच, मात्र या दोघांनाही आता तुरुंगाची हवा खावी लागलीय.

खरंतर हे दोघंही सामान्य कुटुंबातील युवक आहेत. दोघांना कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि गुन्हेगारांशी त्यांचा कुठला संपर्कही नाही. मात्र मनातल्या लोभाला चोरीचं मार्गदर्शन करण्यासाठी यूट्यूबचा त्यांनी वापर केला. मनोरंजन आणि माहिती मिळवण्यासाठी यूट्यूबचा वापर केला जातो. मात्र मनातला लोभ आणि तंत्रज्ञानाचं चुकीचा वापर किरण आणि अमित यांना तुरुंगात घेऊन गेला.