नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिकहून विमान वाहतूक डिसेंबरअखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. एअर डेक्कनच्या 19 सीटर विमानाची सेवा येत्या 22, 23 डिसेंबरपासून नाशिक येथून सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
यासंदर्भात दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
एअर डेक्कनने 19 सीटर विमान दक्षिण आफ्रिकेतून भाडेतत्वावर आणलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकहून हवाई वाहतुकीसंदर्भात फक्त घोषणाच होती. मात्र, नाशिकची उड्डाण योजना अनेकदा लांबणीवर पडली होती.
पण केंद्र सरकारच्या उडान योजनेत नाशिकचाही समावेश झाला आहे. त्यामुळे नाशिक आता देशातील सहा प्रमुख शहरांशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे आता नाशिककर लवकरच हवाई वाहतुकीचा अनुभव घेऊ शकणार आहेत.
40 मिनिटांच्या हवाई प्रवासासाठी 1400 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे काही नशीबवान प्रवाशांना या विमानाने फक्त एक रुपयात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.