नाशिक : महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नाशिकमध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका गतिमंद मुलीचा विनयभंग करून तिचे अपहरण होत असतांनाच एका सजग नागरिकाच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.  विशेष म्हणजे पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व प्रकार घडला आहे.


नाशिक-पुणे महामार्गावरील अत्यंत रहदारीच्या सिन्नर फाटा परिसरात सोमवारी (10 फेब्रुवारी) ही संतापजनक घटना घडली. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारी एक 12 वर्षांची गतिमंद अल्पवयीन मुलगी स्कूल व्हॅनमधून उतरली आणि चालत चालत आपल्या घरी जात होती. मात्र याचवेळी तिच्यावर नजर ठेवून असणारा एक नराधम दुचाकीवर आला. त्याने भररस्त्यात मुलीचा हात पकडून तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे तिला दुचाकीवर बसवत अपहरण करण्याचाही त्याचा प्रयत्न सुरु होता. विशेष म्हणजे ही मुलगी बोलूही शकत नसल्याने ती त्याचा फक्त प्रतिकार करत होती. मात्र ती आरडाओरड करू शकत नव्हती आणि याचवेळी या परिसरातच चिकनचे दुकान चालवणाऱ्या इरफान शेख यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला आणि ते पीडित मुलीच्या मदतीला धावून गेले. आरोपीच्या तावडीतून त्यांनी त्या मुलीची सुटका केली मात्र याचवेळी त्या नराधमाने मी तुला मारून टाकेल अशी इरफानला धमकी देत या ठिकाणावरून पळ काढला.

Hinganghat Nirbahya | मी हिंगणघाटची लेक बोलतेय! जाता जाता काय म्हणाली निर्भया? स्पेशल रिपोर्ट



या सर्व प्रकारानंतर स्थानिक नागरिक या ठिकाणी जमा झाले. प्रचंड घाबरलेल्या पीडित मुलीला धीर देत इरफान शेख यांनी तिला घरच्यांच्या हवाली केले आणि नाशिक रोड पोलिस स्टेशन गाठत स्वतः तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंगासह पोक्सो, अपहरणाचा प्रयत्न तसेच इरफान यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीची दुचाकी जप्त केली आहे. मात्र आरोपीच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलेले नसून त्याच्या शोधासाठी त्यांनी पथके रवाना केली आहेत.

खरं तर हा सर्व प्रकार जिथे घडला आहे, त्या जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावरच सिन्नर फाटा पोलिस चौकी आहे. मात्र ती फक्त नावालाच आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिस चौकीसमोरच असे प्रकार घडत असतील तर पोलिसांना हे गुन्हेगार आवाहनच देत असल्याचं या घटनांमधून बघायला मिळतं आहे. त्या नराधमाला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. इरफान जर त्या मुलीच्या मदतीला धावून गेला नसता तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना समोर आली असती अशी भावना नागरिक व्यक्त करत असून इरफान शेखवर सध्या नाशिकमध्ये कौतुकाचा वर्षाव होतांना बघायला मिळत आहे.

संबंधित बातम्या : 

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

गडचिरोलीतील कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला वेगळे वळण, विवाह केलेल्या जोडप्याचा देखील आत्महत्येचा प्रयत्न