नाशिक : पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतात. मात्र काही वेळा कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच कायदा हातात घेतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या लेखानगरमधील एका बारमध्ये पोलिसानं बार मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दारु आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण केल्याचा आरोप पोलिसावर करण्यात आला आहे. बारमध्ये मारहाण करताना पोलिसानं एका सराईत गुन्हेगाराची मदत घेतल्याचंही बोललं जातं आहे. 29 जानेवारीला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुकटात दारूची बाटली न दिल्याने चक्क पोलिस कर्मचाऱ्याने एका गुंडाच्या साथीने बार मॅनेजरला मारहाण केल्याची ही घटना समोर आली आहे. 29 जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिकच्या लेखानगर परिसरातील एका बारमध्ये पोलिस कर्मचारी भगवान जाधव हा एका सराईत गुंडासोबत या बारमध्ये आला आणि त्याने दारूसह पाण्याची बाटली खरेदी केली. बारच्या मॅनेजरने पैसे मागताच जाधवने त्याला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली.
विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता तू धंदाच कसा करतो ते बघतो अशी दमदाटी देखील केल्याची तक्रार संबंधित मॅनेजरने अंबड पोलिसांकडे केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार घडून देखील पोलीस कर्मचारी आणि त्याचा साथीदार अद्याप फरार असून वरिष्ठ अधिकारी भगवान जाधवला पाठिशी घालताय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जाधव हा पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. एकीकडे शहरात गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं असताना आता पोलिसच गुंडगिरी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
पैसे मागितल्याच्या रागातून नाशिकमध्ये पोलिसाकडून बार मॅनेजरला मारहाण
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
02 Feb 2020 11:07 PM (IST)
काही वेळा कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच कायदा हातात घेतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या लेखानगरमधील एका बारमध्ये पोलिसानं बार मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -