नाशिक : मुंबई-नाशिक हायवेवर जुन्या कसारा घाटात रस्त्यावर दरड कोसळली आहे. ही दरड कोसळल्यानं घाटातील मुंबई आणि नाशिक दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे.


मुसळधार पावसामुळे मुंबई-नाशिक हायवेवारील जुन्या कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे सध्या मुंबई आणि नाशिक दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे.

दरम्यान, या स्थळी पोलीस आणि प्रशासन पोहोचलं असून, दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे नाशिक आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागाला पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलचं झोडपून काढलं आहे. दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी आठ वाजता गंगापूर धरणातून  2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळं नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे मुसळधार पावसाने घोटी-सिन्नर महामार्गवरील पुलाला अनेक ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. त्याच्या दुरूस्तीसाठी महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद राहणार आहे. स्थानिकांनी अनेकवेळा पुलाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाकडे विनंती केली होती.

मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता ऐन पावसाळ्यात दुरूस्तीचं काम हाती घ्यावं लागलं आहे. पूल बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.