नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळील भजगड डोंगरात ट्रेकिंग करताना भटकलेल्या तिघांना ट्रेकर्सनी शोधून काढलं आहे. यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. काल रविवारी सकाळी मुंबईहून 25 जणांची टीम ट्रेकिंगसाठी नाशिकला गेली होती.
नाशिकच्या भजगड या डोंगरामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी 25 जण गेले होते. रविवारी संध्याकाळी हे सर्वजण डोंगराच्या पायथ्याला असलेल्या निरगुड पाडा या गावात पोहचले. मात्र फिरायला गेलेल्या 25 जणांपैकी 22 जणच खाली परतल्याचं टीमच्या निदर्शनास आलं. यानंतर संस्थेतील लोकांनी नाशिकमधील वैनतेह गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेशी संपर्क साधला.
या संस्थेतील ट्रेकर्स आणि काही ग्रामस्थांनी तब्बल पाच तासांची शोधमोहीम राबवली आणि जंगलात भरकटलेल्या या तिघांना शोधून काढलं. हरवलेल्या तिघांना पहाटे तीन वाजता डोंगराच्या पायथ्याला सुखरुप आणण्यात आलं.