नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विक्रमी उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. कारण राजकीय पक्षांच्या एबी फॉर्मची वाट न पाहता 122 जागांसाठी आतापर्यंत तब्बल 2 हजार 967 इच्छुकांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज नोंदणी केले आहेत. तर 420 जणांनी आपले उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत.
ऑनलाईन अर्ज - 2,967
प्रत्यक्ष अर्ज - 420
उमेदवारांच्या याद्या जाहीर न करणाऱ्या राजकीय पक्षांना नाशिकमधल्या इच्छुकांनी सुचक इशारा दिल्याचं बोललं जातं आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. अवघे काही तास शिल्लक असतानाही मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. बंडाळीच्या भीतीनं राजकीय पक्षांनी हे सावध पाऊल उचललं असलं तरी इच्छुकांनीही पक्षांच्या भरवशावर न राहता आपली तयारी सुरु केल्याचं दिसतं आहे.
गेल्या सहा दिवस असलेला उमेदवारी अर्जांचा दुष्काळ गुरुवारी कमी झाला. गुरुवारी एकाच दिवसांत सुमारे 1 हजार 800 ऑनलाईन अर्ज भरले गेले. तर प्रत्यक्षात 285 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. तीन हजाराच्या आसपास इच्छुक दिसू लागल्याने राजकीय पक्षांचही धाबं दणाणलं असून कुणाकुणाला उमेदवाऱ्या द्यायच्या, कुणाची नाराजी ओढवून घ्यायची याची चिंता राजकीय पक्षांना लागली आहे. दुसरीकडे चार सदस्यीय प्रभाग रचनेत आता बहुरंगी लढती होणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.