नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून 16 महत्त्वाच्या कैद्यांना हलवणार
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 01:07 PM (IST)
नाशिक : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून महत्त्वाच्या 16 कैद्यांना हलवण्यात येणार आहे. नुकतेच नाशिकच्या या कारागृहात 4जी स्मार्टफोन सापडले होते. सुरक्षेच्या कारणामुळे या कैद्यांना हलवण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात असलेला महत्त्वाचा कैदी सलीम कुत्ताला सर्वात आधी हलवण्यात येणार आहे. त्याला आज पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवलं जाईल. त्यानंतर आठवडाभरात इतर कैद्यांना इतरत्र हलवण्यात येईल. कारागृहात बेवारस आढळलेले मोबाईल जप्त केल्यानंतर पुन्हा सोमवारी एक कैदी मोबाईलवर बोलताना सापडला होता. तसंच गेल्या 3 दिवसात 8 मोबाईल सापडले आहेत. या सर्व प्रकारानंतर कारागृह सुरक्षेची विशेष पथकानं तपासणी केली आहे. काही कर्मचारी आणि अधिकारीही या विशेष पथकाच्या रडारवर आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अतिमहत्वाच्या 16 कैद्यांना इतर तुरुंगात हलवण्यात येणार आहे. यात अंडा सेलसह 4 विशेष बराकमधील कैद्यांचा समावेश आहे.