नाशिक/कोल्हापूर : नाशिक रोड जेलमधून एका कैद्याकडून 7 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्येही एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.


राज्यातले तुरुंग हे बंदीगृह आहेत की मोबाईल शॉपी असा प्रश्न पडलाय. कारण कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्ये मोबाईल आढळल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक रोड जेलमध्ये आतापर्यंत 14 मोबाईल सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड जेलमध्ये कैद्यांकडून 7 मोबाईल जप्त करण्यात आले होते.

खरं तर कैद्यांना गजाआड असताना संवादाची कोणतीही साधनं वापरता येत नाहीत. पण नाशिकमध्ये झाडाझडतीत 7 मोबाईल सापडल्यानंतर आणखी 7 मोबाईल जमिनीत पुरलेले आढळले. त्यातला एक मोबाईल तर 4G सपोर्टवाला होता.

कराडचा कुख्यात गुंड सल्या चेप्यावर हल्ला केल्या प्रकरणी अटकेतल्या गुन्हेगाराकडे मोबाईल सापडला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण नाशकात सापडलेले हे मोबाईल कुणी वापरले, याचा शोध घेणं गरजेचं आहे. याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.