Nashik News : राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची (State Literary Award) घोषणा करण्यात आली असून यंदा नाशिकच्या (Nashik) सात लेखकांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. सन 2021 साठीचे पुरस्कारासून एक लाख व पन्नास हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा या पुरस्कारांवर नाशिकच्या आठ लेखकांनी ठसा उमटवला आहे. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  


महाराष्ट्र राज्य शासनाचे (Maharashtra Government) यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारात नाशिक जिल्ह्यातील आठ लेखकांनी ठसा उमटवला आहे. . ज्येष्ठ पत्रकार संपादक सुरेश भटेवरा यांच्या शोध : गांधी- नेहरू पर्वाचा" या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार लाभला आहे. तसेच राजा गायकवाड यांच्या "गढीवरून" या पुस्तकाला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. राजा गायकवाड हे नाशिक येथे विक्रीकर उपायुक्त म्हणून सेवा करीत आहेत. येवला तालुक्यातील अंदरसुल येथील राजा गायकवाड यांना विनोदी लेखनासाठी हा पुरस्कार मिळणार आहे. लासलगावच्या सचिन होळकर यांना वसंतराव नाईक पुरस्कार त्यांच्या शेती: शोध आणि बोध या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. 


उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा या अरुण गद्रे यांच्या पुस्तकाला महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. गद्रे यांनी आपल्या वैद्यकीय सेवेचा आरंभ व लेखनाचाही आरंभ लासलगाव येथेच केला होता. हे चारही पुरस्कार एक लक्ष रुपयांचे आहेत. विश्वास जयदेव ठाकूर यांच्या " नात्यांचे सर्व्हिसिंग " या लघुकथा संग्रहाला ग.ल ठोकळ पुरस्कार लाभणार आहे. रा भा पाटणकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार डॉ. प्रकाश शेवाळे यांच्या "अनुष्ठुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान" या संशोधनपर पुस्तकाला मिळणार आहे. बालकवी पुरस्कारावर विवेक उगलमुगले यांची नाम मुद्रा उमटली आहे. ओन्ली फॉर चिल्ड्रेन या बालकविता संग्रहाला हा पुरस्कार लाभणार आहे. 


बाल साहित्य विभागातच ना.धो. ताम्हणकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार डॉ विद्या सुर्वे बोरसे यांच्या कोरा कागद निळी शाई या पुस्तकाला जाहीर झाला आहे. हे पुरस्कार रुपये ५० हजाराचे आहेत. काहींना प्रथम प्रकाशन उपविभागात पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयातील मराठीच्या दोन्ही प्राध्यापकांना यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एवढ्या लेखकांना पुरस्कार मिळण्याचे हे दुर्मिळ उदाहरण असावे असे वाटते. 


लेखकांची ओळख 
दरम्यान विश्वास ठाकूर हे नाशिकच्या विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी सहकार व बँकिंग क्षेत्रातील अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. राजा गायकवाड हे राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात उपायुक्त म्हणून नाशिकला कार्यरत आहेत त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शेवाळे हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल महाविद्यालयाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. सुरेश भटावरा जेष्ठ पत्रकार आहेत. सचिन होळकर हे लासलगाव येथे स्थित असून ते सातत्याने कृषी विषयक लेखन करत असतात. विवेक उगलमुगले हे कवी साहित्यिक असून ते नाशिकला जलसंपदा विभागात सेवार्थ आहेत तर प्राध्यापक विद्या सुर्वे बोरसे या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या व्यंकटराव पंचवटी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून अध्यापन कार्य करतात.