Vilas Shinde : गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराजी व्यक्त करणारे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) माजी महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) सात ते आठ माजी नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. आज रविवारी (दि. 29) सकाळीच ते मुंबईच्या दिशेने शिंदे रवाना होणार आहेत. विलास शिंदे यांनी पक्ष सोडण्यापूर्वीच ठाकरे गटाने शुक्रवारी (दि. 27) त्यांची महानगरप्रमुखपदावरून हकालपट्टी करत दणका दिला होता.
शहरातील एक-एक बडा नेता पक्षाला सोडून चालल्याने शिवसेना ठाकरे गटाची अवस्था बिकट होत आहे. तीन दिवसांपूर्वी विलास शिंदे यांनी समर्थकांसमवेत बैठक घेतली होती. त्यानंतर पुन्हा पक्षाबाबत त्यांनी नाराजी बोलावून दाखवत पंधरा दिवसांनीही पक्षाने दखल घेतली नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे शिंदे हे आठ माजी नगरसेवकांसह रविवारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
पदासाठी जायचे असते तर तीन वर्षापूर्वीच गेलो असतो
पक्षाने वारंवार डावलल्याची भावना विलास शिंदे यांनी बोलून दाखवली होती. पदासाठी शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे असते तर तीन वर्षापूर्वीच गेलो असतो. डी. जी. सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुख केले. त्यांच्या प्रभागात तीन नगरसेवक पक्षाचे निवडून आलेत. त्यातील दोन जणांनी पक्षही सोडला. उलट संपूर्ण शहरातून माझ्या प्रभागातील सेनेचे चारही नगरसेवक निवडून आले होते. पक्षाने हे न पाहता त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. पदासाठी काही करायचे असते तर शिंदेसेनेविरोधात आम्ही आंदोलने केली नसती. मात्र, असे असूनही आपल्या मुलीच्या विवाहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, यापेक्षा कार्यकर्त्याला काय हवे, असे त्यांनी याआधी म्हटले होते.
एकनाथ शिंदेंसारखा नेता जगात नाही
आता पक्ष प्रवेशाला जाण्यापूर्वी विलास शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, आजवर माझ्यावर अन्याय झाला आहे. आम्ही निष्ठावान आहोत. मात्र, किती दिवस निष्ठावान राहायचे? आम्ही शिवसेनेतच जातोय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेत जात आहोत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमच्या समोर तसे चित्र उभे करण्यात आले होते, त्यामुळे आम्ही तसे बोललो होतो. मात्र, जवळ गेल्यावर जाणवते की, माणूस वेगळा आहे. अहोरात्र कार्य ते असतात, असा नेता जगात नाही. माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाच्या घरातल्या लग्नाला शिंदेसाहेब आले होते, त्याचा मला आनंद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, आज पक्ष प्रवेशावेळी विलास शिंदे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार देखील भेट देण्यात येणार आहे.
बडगुजरांनंतर ठाकरे गटाला मोठा धक्का
दरम्यान, यापूर्वी सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर विलास शिंदे देखील सोडचिठ्ठी देणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे.
आणखी वाचा