Nashik Vegetable Market : मान्सूनपूर्व शेती (Agriculture) कामांना आता सुरुवात झाली आहे. शेती कामांमध्ये शेतकरी व्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये (Nashik APMC) फळभाज्या आणि पालेभाज्यांची (Vegetables) आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून सातत्याने भाज्यांची दरवाढ सुरू आहे. कोथिंबीर, कांदापातीने शंभरी आहे. कोथिंबीर 70 ते 100, तर कांदापातीचे दर गगनाला भिडले आहेत. कांदापातीचे दर 30 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हिरवी मिरची, वालपापडी, घेवडा, दोडके, गिलके, कारले आदी भाज्यांच्याही दरातही मोठी वाढ झाली आहे.
उत्पादनात घट झाल्याने भाववाढ
कडाक्याचा उन्हाळा आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे उन्हामुळे आणि अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता उत्पादनात घट झाल्याने भाववाढ झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले
नाशिक जिल्ह्यात काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. चांदवड शहरासह तालूक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. मनमाड शहरात सुमारे तासभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. नांदगाव शहर व परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून शेतात पाणी साचले. देवळा तालुक्यातील उमराणे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे पिता पुत्र पावसामुळे या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेले असताना शेड कोसळले त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. देविदास भाऊराव अहिरे असे या मृत मुलाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेत तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात वीज कोसळल्याने एक बैल व आकाश देवरे नामक 20 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Rain : सप्तशृंगी गडावर जोरदार पावसाची हजेरी, भाविकांची एकच धावपळ, दुकानांमध्येही शिरलं पाणी