नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथिल तलाठ्याने मुळ मालकाच्या नावावर असलेली आठ एकर जमीन मूळ मालकाच्या वारसदारांना डावलत नोंदीमध्ये फेरफार करत आपल्या बायकोच्या नावावर केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मूळ मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तलाठ्याचा हा प्रताप जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे.


येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथिल मंदा पवार असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मंदा पवार यांच्या आईचे निधन झाले आणि नंतर वडिलांचं निधन झाल्याने आई-वडिलांच्या नावे असलेलं शेत जमिनीला वारस नोंद करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात गेल्या. मात्र, त्या शेतजमीनीवर वेगळ्याच वारसाची नोंद झाल्याचं निर्दशनात आले. याची चौकशी केली असता ते वारस दुसरे कोणी नसून वारस नोंद करणाऱ्या अतूल थूल या तलाठ्याच्यी पत्नी अरुणा जगन्नाथ गांजरे असल्याच उघडीस आले. 


या सर्वप्रकरणात तलाठ्याने आपले अधिकार वापरत कागदपत्रांमध्ये फेरफार करुन मूळ मालक राधाकिसन कदम यांची आठ एकर जमीन बायकोच्या नावावर करुन घेतल्याचं समोर आलं आहे. आई-वडिलांच्या जमिनीवर आमचा हक्क असून वारस म्हणून नोंद व्हावी, अशी मागणी कदम यांची मुलगी मंदा पवार यांनी तहसीलदार यांच्याकडे केलीय.


या प्रकरणाची तहसीलदारांकडे तक्रार आल्यानंतर मंडळ अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले असून चौकशी अहवाल आल्यानंतर तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचं तहसीलदार प्रमोद हिले यांनी स्पष्ट केलं आहे. एकुणच आधीच वेगवेगळ्या कारणांनी तलाठी चर्चेत आलेले असताना हा आणखी एक प्रकार समोर आलाय.


तर सर्वसामान्यांनी काय करायचं?
लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत प्रशासनातील कर्मचारी त्याचा असा गैरफायदा घेत असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आता या प्रकरणाची चौकशी होईल, त्यानंतर सत्य समोर येईल आणि मंदा पवार यांना न्याय कधी मिळेल? असे प्रश्न विचारले जात आहे?