Suhas Kande vs Sameer Bhujbal: नांदगाव, मनमाड आणि येवला नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटासोबत कोणतीही युती न करण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपला (BJP) सोबत घेऊन लढण्याची रणनिती भुजबळ आखत होते. मात्र त्यांच्या या सर्व योजना नांदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas) यांनी अक्षरशः विस्कटून टाकल्या आहेत.
नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात औपचारिक युती झाल्याची घोषणा आमदार सुहास कांदे आणि भाजप तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि विशेषतः समीर भुजबळांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. समीर भुजबळ नांदगाव आणि मनमाड येथे भाजपसोबत युती करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन येवला, नांदगाव आणि मनमाड येथे युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपने हा प्रस्ताव नाकारत शिवसेना (शिंदे) सोबत हातमिळवणी केली आहे.
Sameer Bhujbal: समीर भुजबळांची शिवसेनेशी युती न करण्याची घोषणा
नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून नाशिक जिल्ह्यात एकत्र लढण्याचे संकेत दिले जात होते. परंतु काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे थेट विरोधक असल्याने समीर भुजबळांनी नांदगाव, मनमाड आणि येवला येथे युती न करण्याची जाहीर भूमिका घेतली. यामुळे शिवसेना शिंदे गटाने देखील आक्रमक भूमिका घेत समीर भुजबळांच्या भूमिकेला थेट आव्हान दिले.
Suhas Kande vs Sameer Bhujbal: कांदेंनी भुजबळांची रणनीती हाणून पाडली
दरम्यान, समीर भुजबळ भाजपसोबत चर्चेत असतानाच सुहास कांदे यांनीही भाजपसोबत परस्पर चर्चा सुरू ठेवली होती. शिवसेनेने नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी विशेष कोअर कमिटी स्थापन करून भाजपसोबत युतीच्या शक्यतांवर खलबते केली. राजकीय समीकरणात शेवटच्या क्षणी उलटफेर करत शिवसेना-भाजप युती निश्चित झाली आणि समीर भुजबळांची संपूर्ण रणनीती हाणून पाडली गेली. अखेर भुजबळांना अपयश आले, तर सुहास कांदे यांनी राजकीय बाजी मारल्याची चर्चा आता नांदगावमध्ये रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या