Sudhakar Badgujar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, असे सूचक वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तर मंगळवारी सुधाकर बडगुजर यांनी मी स्वतःवर नाराज आहे, पण पक्ष संघटनेत झालेल्या बदलामुळे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील बागुल म्हणाले की, सुधाकर बडगुजर हे जिल्हाप्रमुख असताना त्यांच्या मुलांवर ज्या कारवाई झाल्यात त्यामुळे ते डिस्टर्ब झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मला जबाबदारी देऊ नका, असे याआधी सांगितले होते. सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, ते संजय राऊत यांना सांगितले होते. विलास शिंदे यांच्याकडे लग्न होते, त्यामुळे ते सध्या लग्नात व्यस्त आहेत. त्यांची नाराजी नाही. सत्ताधारी पक्षाकडे सत्तेची ताकद असल्याने तिकडे जाण्याचा अनेकांचा कल असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले सुधाकर बडगुजर?
मी म्युनिसिपल कामगार सेनेचा अध्यक्ष आहे. 2700 कर्मचारी त्या युनियनचे सभासद आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नकारात्मक चर्चा कोणी केली हे मला माहित नाही. पण, आमचे काम आम्ही करत राहणार आहोत. मी स्वतःवरच नाराज आहे. संघटनात्मक बद्दल मध्यंतरीच्या काळात झाले, तेव्हापासून महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा नेते नाराज आहेत. वरिष्ठांपर्यंत त्या भावना गेलेल्या आहेत. स्थानिक नेत्यांना याबाबत माहिती आहे. विलास शिंदे यांच्यासह दहा-बारा जण नाराज आहेत. याआधी मी स्वतःहून म्हटलं होतं की, जिल्हाप्रमुख पदावरून मला बाजूला करा. मी काम करू इच्छित नाही. माझ्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मी मागणी केली होती. त्यानुसार माझी मागणी मान्य देखील झाली. परंतु, संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजीनाट्य चालू झालेले आहे. विलास शिंदे त्यांच्या मुलीचे लग्न होते, त्यावेळेस त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळेस आम्ही त्यांची समजूत देखील काढली. परंतु, पुढील काळात नाराजी निश्चितपणे विलास शिंदे यांच्या कृतीतून आणि भावनेतून दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा