Shravan Somvar 2025 : तिसरा श्रावणी सोमवार (Shravan Somvar 2025) नाशिक ग्रामीण पोलिसांसाठी (Nashik Police) अभ्यास वर्ग ठरणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या (Kumbh Mela 2027) पर्वणीला जसा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे त्याची रंगीत तालीम समजून यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी  पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. 


"मिनी पर्वणी" च्या अनुषंगाने पोलीस दल अलर्ट मोडवर असणार आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदिक्षणा घालण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत असतात. कुंभमेळा दोन वर्षावर आला असल्याने सोमवारी होणाऱ्या गर्दीचे नियोजन कुंभमेळाच्या धर्तीवर केले जाणार असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित राहणार आहेत. 


ड्रोन कॅमेरा, AI तंत्रज्ञानाचा होणार वापर


त्र्यंबकेश्वर मंदीर, कुशावर्त तीर्थ, ब्रह्मगिरी पर्वत, यासह ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येने पोलीस दल तैनात असणार आहे. ड्रोन कॅमेरा, AI तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दीवर नियंत्रण मिळवले जाणार आहे. भाविकांच्या गर्दीत मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे वायरलेस सिस्टीमसह पोलीस स्वतःची संपर्काची वेगळी यंत्रणा उभी करणार आहेत. 


त्र्यंबकेश्वरमध्ये केवळ एसटी बसने होणार वाहतूक  


सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात ज्या पद्धतीने त्रंबकेश्वरपासून काही अंतरावर खाजगी वाहनांची पार्किंग असते, त्याच पद्धतीने नाशिक, मुंबई,  पालघरकडून येणारी वाहतूक काही अंतरावर थांबवली जाणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये केवळ एसटी महामंडळाच्या बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. 


शहरातील मार्गात बदल


- सीबीएस सिग्नलकडून शरणपूररोडने टिळकवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर महामंडळ व सिटी बसेसला परवानगी. 


- सीबीएस स्खिलकडून टिळकवाडीकडे जाणाऱ्यांनी सीबीएस-मेहेर-अशोक स्तंभमार्गे गंगापूररोडने रवाना व्हावे. 


- शरणपूर रोडकडून येणारी वाहतूक पंडित कॉलनीमार्गे गंगापूररोड, अशोक स्तंभमार्गे पुढे जाईल. 


- हे नियम पोलीस, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू नसतील.


त्र्यंबकेश्वरसाठी निर्देश


दरम्यान, रविवारी दुपारी बारा ते सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत त्र्यंबकमार्गे : नाशिक ते जव्हार आणि जव्हार ते नाशिक येथे जाणाऱ्या, येणाऱ्या सर्वच खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेशबंदी असेल. फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस त्र्यंबकेश्वरात येतील. तर सातपूर (हॉटेल अमृत गार्डन, बारदान फाटा पॉईन्ट), गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवरगाव वाघेरा फाटा अबोली फाटा-जव्हार आणि आंबोली टी-पॉईंट, वाघेरा फाटा गिरणारेमार्गे नाशिक असा तात्पुरता पर्यायी मार्ग असेल.



आणखी वाचा 


Nashik Crime : माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले