Shantigiri Maharaj नाशिक : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहू लागलेत. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच प्रत्येक जागेवर दावेदारी वाढत आहेत. यात साधू संत देखील मागे नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir Inauguration) सोहळ्यानंतर देशभरात हिंदुत्ववाची लाट निर्माण करण्याचा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्यामुळे विद्यमान खासदारांसह महायुतीच्या घटक पक्षातील इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
शांतीगिरी महाराज लोकसभेची निवडणूक लढवणार
या लाटेत स्वार होण्यासाठी साधू संतही सरसावले असून जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी असणारे शांतीगिरी महाराज यांनीही दंड थोपटले आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांचा लाखोंचा भक्त परिवार आहे. देशभरात त्यांचे 115 आश्रम असून 7 गुरुकुलाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिले जात आहे.
यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष
शांतीगिरी महाराजांना निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढवीत तिसऱ्या क्रमांकची मत मिळवली होती. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे झालेल्या मत विभाजनाचा शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना चांगलाच फटका बसला होता. खैरेंच्या विजयाचा फरक अवघ्या 32 हजार मतांवर होता. त्याच अनुभवाची शिदोरी, जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहामुळे शांतीगिरी महाराज पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. मात्र यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघावर त्यांचे लक्ष आहे.
रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार - शांतीगिरी महाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला नाशिकमध्ये रोड शो करत नाशिकचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी जो तो प्रयत्न करतोय. नाशिक ही संतांची भूमी असल्याने या भूमीतून रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचा दावा शांतीगिरी महाराज यांनी केला आहे. 2009 लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना 2 लाख 55 हजार 786 मत मिळाली होती तर काँगेसच्या उमेदवाराला 2 लाख 22 हजार 883 मते मिळाली होती तर 1 लाख 48 हजार 26 मतांवर शांतीगिरी महाराजांना समाधान मानावे लागले होते.
कुठल्या पक्षातून लढणार हे अद्याप स्पष्ट नाही
दरम्यान, शांतीगिरी महाराज यांनी अद्याप कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीची चाचपणी करून आपली उमेदवारी अपक्ष असणार की राजकीय पक्षाकडून असणार हे ते स्पष्ट करणार आहेत. मात्र शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीच्या घोषणेने राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा आलाय हे नक्की.
कोण आहेत शांतीगिरी महाराज?
शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत, 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. या आधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करतात.
आणखी वाचा
Chhagan Bhujbal : "मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव"; छगन भुजबळांचे वक्तव्य