नाशिक: सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चोख प्रत्युतर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीला बांबू लावला. विधानसभा निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल. हा बांबू इतका आतमध्ये गेला आहे की, आता त्यांना स्वप्नातही बांबूच दिसतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी अवैध सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना बांबू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून बांबू घातलेलं आहे तो काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आतमध्ये घुसलेला बांबू खेचून काढायचा की ऑपरेशन करुन काढायचा, याचा अभ्यास सध्या देवेंद्र फडणवीस करत आहेत. या अभ्यासावर त्यांना कदाचित एखादी बोगस डिग्रीही मिळू शकते. कदाचित मोदी-शाहाच त्यांना बांबू घालतात, हे बघावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले. 


महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्या. तेलंगणात सरकारने पु्न्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. महायुतीच्या नेत्यांना टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक यांना निधी दिला पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर  तो आम्ही विधानसभेत घालू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी बांबू संवर्धनाविषयीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बांबू संवर्धनाचे महत्त्व पटवून देताना त्यांची गाडी राजकारणाकडे वळली होती. त्यांनी म्हटले होते की, बांबू एक महत्त्वाचा वृक्ष आहे. बांबूचे अनेक बाय प्रोडक्ट आहेत. त्यामुळे बांबूची लागवड मोठ्याप्रमाणावर केली पाहिजे. याशिवाय, काही लोकांना बांबू लावला पाहिजे. काही असे लोक आहेत जे सकाळी-सकाळी भोंगा वाजवतात. एक भोंगा निघालाय तर दुसरा सुरु आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. 


आणखी वाचा


तुम्ही आम्हाला शिव्या द्या, भोकं पडणार नाहीत, पण एक दिवस आम्ही तुम्हाला नक्की बांबू लावू : संजय राऊत


'240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाहांना कळणारही नाही'; संजय राऊत नाशिकमधून गरजले