नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification Case) निकाल तयार झाल्याची सध्या चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar) यांनी निकालपत्राचा मसुदा पाठवला असून 10 जानेवारीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याचं सध्या बोललं जात आहे आणि यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सनसनाटी उत्तर देत शिंदे गटावर हल्ला केला आहे. न्याय देणार न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंददाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा? असं म्हणत नार्वेकर-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राऊतांनी प्रश्न उपस्थित केला आहे.


'देशाची न्यायव्यवस्था गंभीर स्वरुपाला पोहोचली'


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीवरुन राऊतांनी ताशेरे ओढले आहेत. न्याय देणार न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंददाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा? असा सवाल उपस्थित करत, या देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर स्वरुपाला जाऊन पोहोचली असल्याचं संजय राऊत म्हणाले. "नार्वेकर अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाचा जो न्यायमूर्ती आहे, जो न्याय देणार आहे, तोच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटतो आणि चर्चा करतो, ही आपली न्यायव्यवस्था आहे आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे," असं संजय राऊतांनी म्हटलं.


न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटतो - संजय राऊत


देशाची न्यायव्यवस्था बिकट झाल्याचं संजय राऊत म्हणाले. ज्या न्यायमूर्तींवर न्याय देण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सोपावली आहे, तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीसोबत चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो, ही या देशाची अवस्था असल्याचं राऊतांनी म्हटलं. दोन ते तीन दिवसांत येणाऱ्या आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या कृतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे.


'महाविकास आघाडीत एकमत, अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनी लढावी'


वंचितसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि लोकसभेच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं संजय राऊत म्हणाले. अकोल्याची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकर लढतात आणि ती जागा आंबेडकरांनीच लढावी, यावर महाविकास आघाडीचं एकमत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही, असा विश्वासही संजय राऊतांनी यावेळी दर्शवला.


हेही वाचा :


MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, 10 जानेवारीपर्यंत निकाल अनिवार्य