Sanjay Raut on BJP Candidate list : भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी आज (दि.2) लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी (BJP Candidate list) जाहीर केली. दरम्यान, भाजपने यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा तोफ डागली. महाराष्ट्राची यादी करणे त्यांना सोपे नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


भाजपला महाराष्ट्राची यादी करणं सोपं नाही


संजय राऊत म्हणाले, भाजपला महाराष्ट्राची यादी करणं सोपं नाही. दिंडोरीसह राज्यात देखील हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात त्यांच्या कडून लढण्यासाठी उमेदवार नाहीत.  नाशिकचे विद्यमान खासदार आमच्यातून फूटुन गेलेत. ते पुन्हा निवडून येणार नाहीत. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लढण्यासाठी यांनी वाराणसी नाही तर नाशिक मतदारसंघ निवडावा, असेही राऊत म्हणाले. 


शिंदे गटात गेलेले 90 टक्के खासदार आमच्या संपर्कात 


महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. महाविकास आघाडची आता बैठक होणार नाही, बैठका संपल्यात. जागा वाटप सुरळीत पणे पार पडत आहेत. भाजपने जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही कराव्या असे काही नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. आपल्या विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे 2 महिन्यांनी आमची देखील वेळ येईल. शिंदे गटात गेलेले 90 टक्के खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र आम्ही त्यांना घेणार नाही, असेही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 


वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनलीये 


महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यावर आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ जागावाटपाचे निर्णय झालेले आहेत. वंचितने जागांचा प्रस्ताव दिलाय त्यावर प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट केलेच आहे. लवकरच शरद पवार, उध्दव ठाकरे व काँग्रेस नेत्यांसह आंबेडकर यांची बैठक होणार आहे, असेही राऊत यांनी नमूद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


BJP Candidate List: मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?