नाशिक : देशातील रस्तेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे, अनेक नवीन महामार्ग बांधले जात आहेत. त्याच तुलनेने वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, वाढतं दळणवळण हे वाढत्या अपघातांचे (Accident) कारण बनत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत खंत व्यक्त केली होती. मात्र, रस्ते अपघातात अनेकांचे जीव जात असल्याच्या दुर्दैवी घटना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे (Samruddhi mahamarg) लोकार्पण झाले, तो महामार्ग नागरिकांसाठी सुरूही झाला. पण, या महामार्गावरील अपघात हा चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे. सध्या नागपूर ते मुंबई महामार्गावरील काही काम बाकी आहे. तरीही मोठ्या प्रमाणातून महामार्गावरुन वाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. नुकतेच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यामध्ये, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 


नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ आज दुपारच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. त्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना पिंपरी फाट्याजवळ कारचा अपघात झाला. मारुती स्विफ्ट कार चालकाचा वाहनावरील वरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली, त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन आदळल्यानं ही अपघाताची घटना घडली. कारचा स्पीड अधिक असल्याने अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं फोटोतून दिसून येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातातील मृतदेह शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 


हेही वाचा


मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली