Praful Patel on Raj Thackeray नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) कौतुक केले. अजित पवारांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, असे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful patel) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


राज ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांबरोबर होते. शरद पवारांचे जातीचे राजकारण सुरु होते. जेम्स लेन वगैरे प्रकरण सुरु होते. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की, अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ही गोष्ट निश्चित असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले होते. 


राज ठाकरेंचा आणि आमचा काहीही संबंध नाही


राज ठाकरेंनी अजित पवार यांचे कौतुक केल्याबाबत प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे हे एकेकाळी त्यांचा प्रचार करत होते. आता ते आमच्या बाजूने बोलत आहेत. राज ठाकरेंचा आणि आमचा काहीही संबंध नाही. राज ठाकरे आमच्या विरोधातही उमेदवार देणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


लोकसभेच्या तुलनेत येणाऱ्या विधानसभेला चित्र वेगळं दिसणार 


जनसन्मान यात्रेबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. अजित पवारांची लोकप्रियता, त्यांनी केलेले काम हे लोकांना माहिती आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लोकसभेच्या तुलनेत येणाऱ्या विधानसभेला चित्र वेगळं दिसणार आहे. लोकसभेच्या काळातील फेक नेरेटीव्ह लोकांना समजले आहे. लोकही आता बोलायला लागले की, आमचे चुकले होते. देशात आणि राज्यात दोन्ही सरकारमध्ये सुसंवाद राहिला तर त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रात होईल. अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात लक्ष देऊन विकासासाठी सरकारमध्ये असल्यामुळे काम करून दाखवले. सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक मतदारसंघातील सामान्य नागरिकांना होतोय, असे त्यांनी यावेळी सांगितले.  


लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाला मिळणार 


लाडकी बहीण योजनेबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. रक्षाबंधनाला पहिला हप्ता लाडकी बहीण योजनेचा आमच्या सगळ्या बहिणींना मिळणार आहे. महाराष्ट्रात अंदाजे अडीच कोटी महिलांना त्याचा फायदा होईल. एक जुलैपासून कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही. या योजनेमुळे आपल्या लाडक्या भावाला धन्यवाद द्यायला असंख्य बहिणी रस्त्यावर उतरत आहे. अजितदादांना अनेक महिला राखी बांधतात, प्रेमाने बोलतात हेच परिवर्तन आहे. त्यासाठीच आमच्या सरकारने काम केले. महिलांना शिक्षण मोफत मिळणार आहे. त्यामुळे महिला उत्कृष्ट नागरिक म्हणून येत्या काळात काम करतील. लोकसभेच्या काळात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.  कांदा, कापूस, मका या शेतकऱ्यांना फायदा होईल, आम्ही दिलासा देतोय. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा


MNS vs Shivsena Thackeray Camp: मोठी बातमी: ठाकरेंच्या गाडीवर शेण, नारळ फेकणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत