PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाच्या आयोजनाचा मान नाशिकला (National Youth Festival in Nashik) मिळाला आहे. त्यामुळे नाशकात या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Nashik Visit) यांच्या हस्ते तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे.तसेच पंतप्रधान मोदी हे नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. तसेच रामकुंड परिसराची ते पाहणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस त्यांच्या ताफ्यासह सज्ज झाले आहेत.
अतिरिक्त अडीच हजार पोलीस नाशकात दाखल
राज्यभरातून अतिरिक्त पोलीस नाशिकला दाखल होणार आहेत. यामध्ये १३० पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार अंमलदार व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या (एसआरपीएफ), असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये दाखल होणार आहे. विविध जिल्ह्यांमधून १३ बॉम्ब शोधक-नाशक पथकांनाही पाचारण करण्यात येणार आहे.
हेलिपॅड, कॅन्वाय रूट, रोड-शो परिसर, सभास्थळ अशा वेगवेगळ्याप्रकारे बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकारी व त्याच्या अखत्यारीतील कर्मचारी पथकाला जबाबदारी सुनिश्चित करून देण्यात येत आहे.
बॉम्बशोधक-नाशक पथकांकडून तपासणी
जलद प्रतिसाद पथके, दंगल नियंत्रण पथकांचे अधिकारी असणार आहे. त्यासाठीचे नियोजनही पूर्ण झाले आहे. एसपीजीचे पथक नाशिक शहरात दाखल झाले आहे. शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या बॉम्बशोधक-नाशक पथकांकडून तपासणी सुरू झाली आहे.
परिसराची पोलिसांकडून पाहणी
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांच्यासह सर्व सहायक आयुक्तांनी तपोवन सभास्थळ, हेलिपॅड, रोड-शोचा परिसर व नकाशाचे निरीक्षण केले आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन केले आहे.
सभास्थळी चोख तपासणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल.
नाशिक जिल्ह्यात 'नो ड्रोन झोन'आदेश लागू
नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. 10 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
आणखी वाचा