Nashik PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Scheme) दोन हजार रुपयांचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. जुलैपर्यंत कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, मात्र नाशिक जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ होणार नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून वारंवार सूचना देऊनही या शेतकऱ्यांनी पात्रतेची पूर्तता केली नसल्याने त्यांना आता थेट अपात्र म्हणून घोषित  केले जाण्याची शक्यता आहे. 


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojna) शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने 2-2  हजार रुपये करून, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले असून आता शेतकरी 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अर्थात त्यांना यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. पीएम किसान योजनेत सहा हजार रुपये दोन- दोन हजारांच्या तीन हप्त्यांनी शेतकयांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 13 वा हप्ता देण्यात आला आहे. मात्र ई- केवायसी, आधार संलग्नता, भूमी अभिलेख नोंदी तसेच डाटा दुरुस्ती केलेली नसल्याने जिल्ह्यातील1 लाख 58 हजार 645 शेतकरी 14 व्या हफ्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 


दरम्यान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडुन (State Govenmnet) लाभार्थ्यांना कागदपत्रे पूर्ततेबाबत वारंवार आवाहन करत असून त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना जागरूक करण्याचे काम केले जात आहे. मात्र अजूनही शेतकरी पुरेसा प्रतिसाद देत नसल्याने जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे. राज्यात हीच संख्या 11 लाख 44 हजार इतकी असल्याचे समोर आले आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत माहिती भरणे, ई-केवायसी करणे, तसेच बँक खाते आधार संलग्नीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी अजूनही यासाठी प्रतिसाद दिला नसल्याने या शेतकऱ्यांना योजनेतून बाद केले जाण्याची शक्यता आहे. 


केवायसीसाठी 15 तारखेपर्यंत मुदत


दरम्यान ज्या शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी 15 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. योजनेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी पुन्हा एकदा शासनाने वाढीव मुदत देऊ केली आहे. 1 ते 15 मे या कालावधीत पूर्तता करण्यासाठी मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत गावपातळीवर शिबीरे, ई-केवायसीसाठी सामाईक सुविधा तर आधार संलग्नीकरणासाठी टपाल खात्यात सुविधा करण्यात आली आहे. प्रलंबित ई केवायसी आणि आधार संलग्न न झालेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार असून या प्रत्येकाशी संपर्क केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.