मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादीसोबत (NCP) आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, असं वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकीआधी (Vidhan Sabha Election 2024) महायुतीतील (Mahayuti) धुसपूस समोर आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
उमेश पाटील म्हणाले की, तानाजी सावंत यांचे वक्तव्य चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करावी. एकतर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या, असा थेट इशाराच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
एवढ्या खालच्या स्तरावरचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही
आम्ही सत्तेला लाचार नाही, विकासासाठी आलो आहोत, असे बोलणे ऐकून घेण्यासाठी नाही. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा दर्जा तानाजी सावंत यांच्यामुळे घसरला आहे. एवढ्या खालच्या स्तरावरचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्हाला असे कोणी बोलले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. याबाबत पुढे काय करायचे याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?
तानाजी सावंत म्हणाले की, आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या