Nashik Weather Update : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये (Nashik) उन्हाचा पारा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी थंडी तर दिवसभर उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नाशिककरांच्या आरोग्यावर देखील त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने नाशिककरांची अक्षरशः लाहीलाही होत आहे. यामुळे आजारांचा देखील आलेख वाटत असून आरोग्य यंत्रणादेखील आता सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानाची घसरण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यवर देखील त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेत विविध उपयोजना आणि योग्य औषधांचा साठा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 17 तर कमाल तापमान दुप्पट अर्थात 30 ते 35 अंश सेल्सिअस असे नोंदवले जात आहे. यामुळे तापमानात मोठा परिणाम दिसून येत आहे. या तापमानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासनाने होणाऱ्या वातावरणीय बदलाच्या खबरदारी म्हणून दहा बेड राखीव करून उष्मघाताच्या कक्षाची उभारणीची तयारी सुरू केली आहे.
तापमान बदलामुळे नाशिककर त्रस्त
बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना नागरिकांना त्रास होत असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा वाटणे, घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे, या बाबींची देखील सुरुवात झाली आहे. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी न घेणाऱ्यांना त्याची झळ बसत आहे. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढत असल्याने नाशिकच्या रामकुंडावर देखील पाण्यात डुबकी मारण्यासाठी लहानगे दिसून येत आहे. तर उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी नाशिककर डोक्यात टोपी, डोळ्याला चष्मा आणि इतर तत्सम वस्तूंचा वापर करत आहे. सकाळच्या थंडीनंतर दिवसभर उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नाशिककरांकडून शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी केली जात आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शांतता दिसून येत आहे. दुचाकी चालक सिग्नलवर सावलीचा आधार घेऊन थांबा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांचा सल्ला
उन्हाच्या तीव्रतेने आरोग्यवर देखील मोठा बदल दिसून येत असल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मात्र आता रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डोकेदुखी, सर्दी, यांसारख्या व्हायरल आजाराने देखील डोके वरती काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या कडाक्यामुळे नाशिककरांच्या शरीराशी अक्षरशः लाहीलाही होत आहे. यामुळे नाशिकरांच्या आरोग्य देखील धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. मात्र उन्हाचा पारा एप्रिल मे मध्ये अधिक प्रमाणात दिसून येईल अशी देखील शक्यता आता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. तापमान वाढू लागल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याची आव्हान देखील आरोग्य विभागाकडून केले जात आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका, बिनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नका. कामानिमित्त बाहेरे जायचे असेल तर छत्री, टोपी, हेल्मेट घाला, घरातील स्वच्छ पाणी बाहेर जाताना घेऊन निघा, सैल, सुती व फिकट रंगांचे कपडे परिधान करा, असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
आणखी वाचा
भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात मराठीच