Nashik Weather Update नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात थंडी (Cold) कमी झाल्याचे चित्र होते. यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात अचानक तापमानात घट झाली आहे. दोन दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. 


नाशिकमध्ये रविवारी 10.2 किमान अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी कमाल तापमान 30.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.  तर शनिवारी किमान 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांनी कपाटात ठेऊन दिलेले उबदार कपडे पुन्हा एकदा परिधान करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. 


निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद


तर, निफाडमध्ये (Niphad) रविवारी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे निफाडकरांना पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी निफाडचे कमाल तापमान 28.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. निफाडला यंदा 4.4 अंश सेल्सिअस या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील महिन्यातच शेतकऱ्यांनी द्राक्षबागा वाचवण्यासाठी आपापल्या शेतात शेकोट्या पेटविल्या होत्या. शेतकऱ्यांची (Farmers) मागील महिन्यात ससेहोलपट होताना दिसून आले होते.


पाच जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज


दरम्यान, आजपासून पुढचे पाच दिवस म्हणजे २९ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. त्यातही २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस वीजा व गडगडाटीसह होणाऱ्या पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या ५ जिल्ह्यात ही तीव्रता अधिक राहिल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 


शेतकऱ्यांची चिंता वाढली


मागील तीन-चार वर्षांपासून सतत अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा पावसळ्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने याच फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतकरी त्यातून सावरत असतनाच रब्बी हंगामात आता अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहेत. अशात आता पुढील पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut : आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल


'या वयातही पवार साहेब रायगडावर गेले हे कौतुकास्पद, पण आगामी निवडणुकीत...'; काय म्हणाले छगन भुजबळ?