Nashik Teachers Constituency Election 2024 : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) पार पडल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. महायुतीत (Mahayuti) नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आता महाविकास आघाडीत देखील फाटाफूट झाल्याचे चित्र आहे. नाशिकच्या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार दिलेला असतानाही काँग्रेसने या जागेवर दिलीप पाटील (Dilip Patil) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही महायुतीने यातून काहीच धडा घेतल्याचं दिसत नाही. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराला पक्षाचे अधिकृत एबीफॉर्म देण्यात आल्यानं गोंधळात अधिकच भर पडली आहे. किशोर दराडे यांनी शिवसेनेकडून तर महेंद्र भावसार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अर्ज दाखल केला आहे, भावसार निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत तर वरीष्ठपातळीवर बोलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांना दिली आहे.  


भाजपचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीचा गोंधळ सुरू असतानाच भाजपचे धनराज विसपुते यांनीही  उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्षाकडून अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावा विसपुते यांनी केला आहे, तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला असून महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.


लोकसभेसारखाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत गोंधळ


लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला हेमंत गोडसे यांचे नाव चर्चेत होते. मात्र छगन भुजबळ यांनी उडी घेतल्यानं उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरू होता. त्याचा फटका हेमंत गोडसे यांना बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा तोच गोंधळ महायुतीमध्ये दिसत आहे. त्यामुळे यातून महायुती कसा मार्ग काढणार, यातील कोण कोण माघार घेणार? एकच उमेदवार राहणार की इतर ही आपली दावेदारी कायम ठेवणार? याकडे लक्ष लागले आहे 


महाविकास आघाडीतही फाटाफूट 


तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही फाटाफूट झाल्याचे दिसून आलंय.नाशिक शिक्षक मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आलेली असताना आता काँग्रेसकडूनही दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सूचना केल्या होत्या. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरलाय, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


Nashik Teachers Constituency : 'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप