नाशिक : नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत (Talathi Exam 2023) गैरप्रकार करणाऱ्या गणेश गुसिंगेचा मोबाईल रिसेट असून गोपनीय माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत, अशी माहिती सरकारी पक्षाने मंगळवारी (22 ऑगस्ट) न्यायालयात दिली. तसेच त्याने वनरक्षक परीक्षेतही परीक्षार्थींना मदत केल्याचा आणि गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचा नाशिक पोलिसांना संशय असल्याचं सरकारी पक्षाने म्हटले आहे. दरम्यान न्यायालयाने गणेशच्या पोलीस कोठडीत 25 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत उघडकीस आलेल्या गैरप्रकारानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. हायटेक कॉपी प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गणेश गुसिंगेला म्हसरुळ पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकीटॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि श्रवणयंत्र असे साहित्य हस्तगत केले होते. त्याच्या मोबाईलमध्ये तलाठी पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचे फोटोही आढळून आले होते. दरम्यान याप्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश असलेल्या विशेष पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपासबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
गणेश गुसिंगेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान मंगळवारी न्यायालयात सरकारी पक्षाने आपली बाजू मांडताना गणेशचे आणखी तीन साथीदार असून शहर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. त्याने वनरक्षक परीक्षेत परीक्षार्थींना मदत केली असावी असा आम्हाला संशय आहे. विशेष म्हणजे त्याचा मोबाईल रिसेट असल्याने गोपनीय माहितीही मिळू शकलेली नाही. तसेच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असू शकते, त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. तर बचाव पक्षाने गणेश गुसिंगे बहिणीला तलाठी परीक्षेसाठी घेऊन आला होता. पोलिसांच्या तपासात प्रगती नसून बहीण परीक्षेचा अभ्यास करत असल्याने अभ्यासासंदर्भात माहिती मोबाईलमध्ये होती असे म्हटले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपी गणेश गुसिंगेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान तीन दिवसात नाशिक पोलीस कसा तपास करतायत याकडे आता लाखो परीक्षार्थींचं लक्ष लागले आहे.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हायटेक कॉपीचा प्रकार उघड
आरक्षण आणि पेसा कायद्यातील तरतुदींमुळे अडकून पडलेल्या तलाठी भरती परीक्षेला मुहूर्त लागला आणि 17 ऑगस्टपासून या परीक्षेला सुरुवात झाली. 4 हजार 466 जागांसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी यासाठी अर्ज केला. राज्यभरात ही परीक्षा ऑनलाईन सुरु आहे, मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला आणि पोलीस चक्रावून गेले. तीन सत्रात ही परीक्षा पार पडत असतानाच पहिल्या सत्रात नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेब ईझी या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होती. दरम्यान यावेळी काही जण कॉपीसारखा प्रकार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच केंद्राबाहेर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली आणि केंद्रावर हायटेक कॉपी सुरु असल्याचं समोर आलं.
एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करत मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या गणेश गुसिंगे नावाच्या तरुणाला अटक केली.
हेही वाचा