Samruddhi highway accident: राज्यातील सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गामुळे अगदी कमी वेळात प्रवास करणे शक्य झाले असले तरी हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याच्या गृहीतकावर शिक्कामोर्तब करणाऱ्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात. यामध्ये आता आणखीन एका अपघाताची भर पडली आहे. यामुळे कल्याण परिसरातील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi highway) सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे सोमवारी हा अपघात झाला. कारचा टायर फुटल्यामुळे हा अपघात (Road Accident) झाला. या अपघातामध्ये निलेश बुकाणे, वैशाली घुसळे या दोघा बहीणभावांसह निलेश बुकाणे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत असलेली लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली आहेत. हे सर्वजण कल्याण पूर्वेला असणाऱ्या चिंचपाडा परिसरात वास्तव्याला होते. या अपघाताच्या बातमीने चिंचपाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik news)
हे सर्वजण एका लग्नसमारंभासाठी जात असताना हा अपघात घडला. सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारानजीक वेगात धावणाऱ्या किया कारचा अचानक टायर फुटला. टायर फुटताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यावेळी ही कार इतक्या वेगात होती की या कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे गाडीतील तिघांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या जोरदार आवाजाने पाटोळे परिसरातील स्थानिक रहिवाशांनी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) धाव घेतली. जखमींना उपचारासाठी सिन्नर येथे घेऊन जात असतानाच नीलेश बुकाणे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची बहीण वैशाली सचिन घुसळे (वय 35) हिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. तसेच छाया नीलेश बुकणे (वय 30) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सचिन घुसळे (वय 40), अर्णव नीलेश बुकाणे (वय 14), गोल्डी नीलेश बुकाणे (वय 10), सुयश घुसळे (वय 3), निरव गायकवाड (वय 10), मनस्वी गायकवाड (वय 5), साची सचिन घुसळे (वय 9) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक प्रशांत शिरसाट (वय 32) किरकोळ जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर तातडीने बचावकार्य राबविण्यात आले. सुदैवाने मुलं बचावली असली तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे. या कारमधून एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यामध्ये आठ लहान मुलांचा समावेश होता. दुर्दैवाने या अपघातात प्रौढांमधील एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले. जखमी झालेल्या मुलांसह इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर अवस्थेतील तिघांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
Nashik news: अपघातापूर्वीचा व्हिडीओ पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले
हा अपघात होण्यापूर्वी घुसळे आणि बकाणे कुटुंबीय आनंदात गाडीतून प्रवास करत होते. गाडीत सुरु असलेल्या मौजमजेचा एक व्हिडीओ त्यांच्यापैकी कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये सर्वजण अत्यंत आनंदात दिसत होते. लहान मुलं खिदळत होती मात्र, त्यानंतर काहीवेळातच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातल्यानंतर हा व्हिडीओ पाहून नातेवाईकांचे डोळे पाणावले. दरम्यान, अपघातानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, क्यूआरव्ही पथक व महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना १०८ रुग्णवाहिका तसेच समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे सिन्नर येथील रुग्णालयात (Hospital) दाखल केले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरून हटवून सिन्नर पोलीस ठाण्याच्या (Sinnar Police Station) आवारात लावण्यात आले आहे. या अपघाताची माहिती सिन्नर पोलीस ठाण्यास देण्यात आल्यानंतर अपघाताचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला.
आणखी वाचा